firoz shekuwale फिरोज शेकुवाले | शिधापत्रिका ऑनलाइन

शिधापत्रिका ऑनलाइन

धान्य वाटप प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास होणार मदत

बदल | महा सेवा केंद्रातर्फे हाेणार धान्याचे वाटप, कारंजा तालुक्यात १४८ दुकाने

४२ हजार ८३३ इतकी शिधापत्रिका धारकांची तालुक्यातील संख्या
गैरव्यवहाराला आळा बसणार

फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड) 
प्रशासकीय सर्वेक्षणात बोगस शिधापत्रिका मोठ्या प्रमाणात आढळल्याने त्यात सुधारणा होऊन गरजू लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने शिधापत्रिका ऑनलाइन करून त्याचे वाटप महा सेवा केंद्राच्या वतीने लवकरच करण्यात येणार आहे.
ग्रामीण शहरी भागात गरजू कुटुंबाला रास्त भावात अन्न धान्य मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून रास्त भावात धान्य वाटप केले जाते. त्यामध्ये तालुुक्यात १४८ स्वस्त धान्य दुकान असून ४२ हजार ८३३ इतकी शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. त्यात अन्नपूर्णा ३६४ अंत्योदय सहा हजार ७३९ तर पांढऱ्या शिधा पत्रिकाधारक ११७० आहे. तर बिपीएल प्राधान्य गटातील २० हजार ६५ शिधा पत्रिकाधारक आहे.  प्रशासकीय सर्वेक्षणात बोगस शिधापत्रिका मोठ्या प्रमाणात आढळल्याने त्यात सुधारणा होऊन गरजू लाभार्थींंना योजनेचा लाभ मिळावा या उदेशाने शिधापत्रिका ऑनलाइन करून वाटप महा सेवा केंद्राच्या वतीने करण्यात येत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गरिबांना स्वस्त दराने अन्नधान्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली.
या योजनेच्या माध्यमातून स्वस्त दरात गहू, तांदूळ, केरोसीन साखर तसेच भरडधान्य वाटप केले जाते. यामध्ये शिधापरित्रका धारकांची सोय आणि भौगोलिक संरचना विचारात घेऊन रास्त भाव दुकान सुरू करण्यात येते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेपर्यंत ३५ किलो धान्य त्यामध्ये गहू पाचशे रुपये तर तांदूळ सात रुपये दराने दिले जाते. दारिद्र्यरेषेवरील केसरी शिधापत्रिकाधारकांना एक कुटुंबास पंधरा किलो धान्य त्यामध्ये गहू सात रुपये वीस पैसे, तर तांदूळ नऊ रुपये साठ पैसे दराने प्रतिकिलो ने विक्री केले जाते. ही सार्वजनिक वितरण व्यवस्था केंद्र राज्य सरकारच्या वतीने संयुक्तरीत्या राबवली जाते.
२०१४ पासून सर्व दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न ४० हजार ते शहरी भागातील उत्पन्न ५९ हजार धरले गेले आहे. अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिका धारकास ३५ किलो मिळते. गहू रुपये दोन रुपये किलो तर तांदूळ तीन रुपये किलो धान्य दिले जाते.
अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी राष्ट्रीय वृद्धापकाळातील निवृत्तिवेतनधारक किंवा राज्य निवृत्तिवेतनधारक किंवा ६५ वर्षांवरील निराधारांना अन्नपू्र्णा योजनेंतर्गत लाभार्थींना दरमहा दहा किलो धान्य मोफत दिले जाते.

काम अंतिम टप्प्यात
जास्तदराने धान्य वाटप करणे, काळ्या बाजारात धान्य पाठवणे आदी विविध वाढत्या तक्रारीमुळे केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या सहकार्याने सर्वेक्षण करून ऑनलाइन करून नवीन शिधापत्रिका वाटप , स्वस्त धान्य दुकानदारांची धान्यसाठा बाबतची माहिती ऑनलाइन होणार अाहे. त्यामुळे यामध्ये होणाऱ्या गैरव्यवहार कमी होणार आहेत. या संदर्भात काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसांत पूर्ण होईल.
-चेतन गिरासे, तहसीलदार,कारंजा

पारदर्शकता येईल
गरजूकुटुंबाला धान्य मिळण्यासाठी शासनाकडून योजना राबवण्यात येते. परंतु त्यांच्यापर्यंत काही वेळेस धान्य जात नाही. ऑनलाइन शिधापत्रिका दुकानामुळे किती धान्य वाटप झाले तसेच कोणाला मिळाले यांची मािहती मिळणार असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे. यामुळे सर्वांना गरजूंना मुबलक धान्य मिळेल.''  शितल बरडिया,नगर सेवक न.प.कारंजा 

-महा सेवा केंद्राशी संपर्क साधावा
 नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी व काही बदल करावयाचा असेल तर जवळच्या महासेवा केंद्राशी संपर्क साधून शासकीय दराप्रमाणे पैसे देऊन रीतसर पावती घ्यावी. तसेच आगाऊ पैशाची कोणी मागणी करत असेल तर त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments